Annapurna Yojana 3 gas cylinders राज्यातील सुमारे 3.49 कोटी कुटुंबांना घरगुती गॅस जोडणी असून, यापैकी 2 कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हा गरीब कुटुंबांसाठी वरदान ठरू शकतो.
गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमुळे महाराष्ट्रातही गरीब कुटुंबांमध्ये गॅस जोडण्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, गॅस जोडण्या असूनही गरीब कुटुंबांना गॅस सिलिंडर पुनर्भरणासाठी खर्च करणे अवघड जात असल्याचे चित्र आहे. या कारणामुळे गरीब कुटुंब वृक्षतोड करून लाकूड वापरत असल्याच्या घटना आढळून आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गरीब कुटुंबांची मदत करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गरीबांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
संपूर्ण महाराष्ट्रात 3.49 कोटी कुटुंबांमध्ये घरगुती गॅस जोडण्यांचे प्रमाण आहे. या पैकी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वार्षिक तीन गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत दिले जाणार आहे.
गरीब कुटुंबांमधील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा यासाठी एलपीजी गॅसचा वापर खूप महत्त्वाचा ठरतो. त्याचबरोबर या योजनेमुळे महिलांच्या आरोग्यातही सुधारणा होण्यास मदत होईल.
योजने अंतर्गत मिळणार काय लाभ?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या 52 लाख 16 हजार पात्र लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 3 गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.
याशिवाय, ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर होईल.
या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातून केवळ एकाच महिलेला लाभ मिळेल. बँक खात्यात जमा होणार अनुदान
उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत केंद्र सरकार पात्र महिला लाभार्थ्यांना प्रत्येक गॅस सिलिंडरसाठी 300 रुपये देत असते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखी 530 रुपये जमा करेल.
त्यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक गॅस सिलिंडरसाठी 830 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील.
या योजनेअंतर्गत एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलिंडरसाठी अनुदान मिळणार नाही. 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल. त्यानंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका योजनेस पात्र ठरणार नाहीत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी (e KYC) करणे गरजेचे आहे. तसेच त्यांचे बँक खाते आधार सलग्न करून घेणे आवश्यक आहे.
या प्रकारे गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर पुनर्भरण देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील गरीब कुटुंबांच्या आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने ही योजना फायदेशीर ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.